Skip to main content
WCS
Menu
About Us
Board of Directors
Important Committees
Financials
Internal Policy
Programmes
Director
Cross-Functional
Focal
Support
Newsroom
Blog
News
Wildlife Trade News
Opportunities
Admin Consultant
Consultant - Reducing Turtle Consumption
Resources
Publications
Annual Reports
Gallery
BlueMAP-India
Donate
Search WCS.org
Search
search
Popular Search Terms
Wildlife Conservation Society - India
Wildlife Conservation Society - India Menu
About Us
Programmes
Newsroom
Opportunities
Resources
Donate
Newsroom
Blog
Current Articles
|
Archives
|
Search
A glimpse of the life of the Great Hornbill
Views: 2517
| March 15, 2019
ग्रेट हॉर्नबिल: एका आगळ्यावेगळ्या पक्ष्याच्या दुनियेची सफर
-पूजा यशवंत पवार
रानावनांत भटकताना आपण निसर्गाच्या जादुई दुनियेमध्ये रममाण झालो नाही तर नवलंच. कित्येक वेगेवेगळे, विविध रंगांचे, आकारांचे प्राणी-पक्षी, त्यांचे नानाविध आवाज, सवयी, इत्यादी गोष्टींमुळे प्रत्येक क्षणी नवीनचं अनुभूती असते.पक्षी निरीक्षणाचा छंद जोपासताना, वन्यजीव संशोधन करताना अनेक जंगलात भ्रमंती करायची संधी मला मिळाली. वनशास्त्राची पदवी मिळाल्यानंतर उच्च शिक्षणासाठी वन्यजीव संशोधन आणि संवर्धन हा विषय मी निवडला. ग्रेट हॉर्नबिल या भारतातल्या जंगलात आढळणाऱ्या सर्वात मोठ्या पक्ष्यावर माझे संशोधन सुरु झाले. या पक्ष्याबद्दल आणि त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण राहणीमान आणि सवयींचा परिचय करून देणारा हा लेख.
ग्रेट हॉर्नबिल (Buceros bicornis) हा आपल्या देशात आढळणाऱ्या धनेश कुळातील नऊ प्रजातींपैकी आकाराने सर्वात मोठा पक्षी. भारतात पश्चिम घाट आणि उत्तर आणि ईशान्येकडील सदाहरित वनांमध्ये ग्रेट हॉर्नबिलचे वास्तव्य आहे. पश्चिम घाटात महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळ या राज्यांमध्ये हा पक्षी आढळतो.तसेच ग्रेट हॉर्नबिल अनेक आग्नेयकडील देशांमध्ये प्रामुख्याने आढळतो. भली-मोठी तरीही रेखीव चोच, आकर्षक रंगसंगती, मोठा आकार, चित्तवेधक सवयी आणि दुर्मिळता यांमुळे ह्या पक्ष्याचे दर्शन हि पक्षी निरीक्षकांसाठी खास पर्वणीच असते. सदाहरित वनामध्ये नैसर्गिक समतोल राखण्याची जबाबदारी हॉर्नबिल्स पार पाडतात. अनेक दुर्मिळ आणि महत्वाच्या वृक्षांच्या बीजप्रसारणाचे मोलाचे कार्य हॉर्नबिल्स करतात. हॉर्नबिल्सचा वावर असणारी वने हि अव्वल दर्जाची मानली जातात. पश्चिम घाटात ग्रेट हॉर्नबिल्स बरोबरच मलबार ग्रे, मलबार पाईड आणि इंडियन ग्रे या तीन हॉर्नबिल प्रजातींचे वास्तव्य आहे ग्रेट हॉर्नबिल च्या पंखांचा विस्तार साधारण दीड मीटर एवढा असतो. काळ्या-पांढऱ्या रंगाचे पंख, पिवळ्या रंगाची मान आणि त्यावर पिवळी, मोठी, दिमाखदार शिंगासारखी चोच असा हा पक्षी अत्यंत मनमोहक आणि भव्य भासतो. त्याच्या विशिष्ट पंख-रचनेमुळे हा पक्षी उडताना हश्श हश्श असा मोठा आवाज होतो. अनेक निसर्गप्रेमी या आवाजाला ट्रक सुरु होताना होणाऱ्या आवाजाची उपमा देतात. हॉर्नबिलचे आयुर्मान जवळपास २०- २५ वर्षे असते आणि वयाच्या चौथ्या वर्षांपासून हॉर्नबिल प्रजनन करू लागतात. नर आणि मादी यांची एकदा निवड केलेली जोडी आयुष्यभर घट्ट राहते. धनेश कुळातील प्रजाती मोठमोठ्या झाडांच्या ढोलीत घरटी करतात. हॉर्नबिल्स स्वतः ढोली कोरू शकत नाहीत. तांबट पक्षी, सुतार पक्षी यांसारखे पक्षी झाडामध्ये ढोली कोरतात आणि अशा ढोल्यांचा किंवा झाडाची फांदी तुटून नैसर्गिक कारणांमुळे तयार झालेल्या ढोल्यांचा वापर घरटं म्हणून करतात. एकदा निवडलेलं अनुरूप घरटं एकच जोडी वर्षानुवर्षे वापरते. काही घरटी अगदी २० वर्षांपर्यंत वापरात असल्याच्या नोंदी आहेत.अत्यंत वेगळी अशी त्यांची घरट्याची आणि प्रजननाची पद्धत असते. वीणेच्या हंगामात नर आणि मादी त्यांच्या घरटं असलेल्या परिसरात घुटमळू लागतात. ढोली असलेल्या झाडाचे आणि ढोलीचे परीक्षण करतात. मादी ढोलीत शिरते आणि ढोलीचा प्रवेश लिपून घेते. केवळ चोच बाहेर काढण्यापुरती, उभी फट ठेवली जाते. घरट्यात कैद होऊन बसलेल्या मादीला आणि अंड्यातून बाहेर आलेल्या पिल्लाला चारापाणी पुरवण्याची जबाबदारी संपूर्णपणे नर सांभाळतो. ग्रेट हॉर्नबिल्सचा वीणेचा हंगाम ऑक्टोबर पासून सुरु होतो, डिसेंबर मध्ये मादी घरट्यात शिरते आणि ४ महिने घरट्यात असते.
नर हॉर्नबिल ४ महिने अविरत परिश्रम करून वेगवेगळी फळं आणि छोटे प्राणी घरट्यात आणतो. हॉर्नबिल्सच्या घश्यात पिशवीवजा असलेल्या कप्प्यात (गुलर पाउच) नर फळं साठवून घरट्यापाशी येतो, आणि एकेक करून ती फळं घश्यातुन चोचीत घेऊन ढोलीच्या अरुंद फटीतून मादी आणि पिल्लाला भरवतो. एकावेळी ४०० हून अधिक फळं आणलेली बघायचा योग मला या अभ्यासादरम्यान आला. प्रामुख्याने रसरशीत, उंबर कुळातील फळं हा हॉर्नबिल्सचा आहार. त्याच्या आहारात इतर फळं उदाहरणार्थ जंगली जायफळ, जंगली बदाम, जांभूळ, इतर वेलींची फळं इत्यादींसारख्या २० वृक्ष-प्रजातींचा समावेश असतो. हॉर्नबिल्स उत्तम शिकार सुद्धा करतात. अनेक कीटक, पाली-सरडे, साप, बेडूक, उंदीर-खारी, इतर पक्ष्यांची पिल्ले, वटवाघळे, सापसुरळी यांसारख्या प्राण्यांची शिकार हॉर्नबिल्स सर्रास आणि सफाईदारपणे करतात. रसरशीत फळं हि आवश्यक असणारी कर्बोदके, शर्करा, खनिजे, कॅल्शिअम आणि इतर पोषक घटकांची पूर्तता करतात; तर पिल्लांची वाढ होण्यासाठी आणि प्रथिने मिळवण्यासाठी प्राण्याचे मांस उपयुक्त ठरते. पहिल्या सात आठवड्यानंतर पिल्लाची चिवचिव ऐकू येऊ लागते आणि १२०-१४० दिवसांनंतर पिल्लू घरट्यातून बाहेर झेपावते. अनामलाई पर्वतरांगाच्या घनदाट जंगलात या पक्ष्यांचा अभ्यास करणे हे माझ्यासाठी अविस्मरणीय तर आहेच, आणि निसर्गातील प्रत्येक जीव किती वैविध्यपूर्ण आहे याची पदोपदी अनुभूती देणारा सुद्धा आहे.
जितकी हॉर्नबिल्सची वेगळी जीवनशैली तितकीच त्यांना सामोरी जावी लागणारी संकटंही वेगळी. गर्द हिरवाई असलेली सदाहरित वने हा ग्रेट हॉर्नबिल्सचा अनुकूल अधिवास. सध्याच्या विकासाच्या नावाखाली अशा जंगलांची कत्तल होते आहे. अनेक ठिकाणी जंगल तोडून नगदी पिकांची लागवड केली जाते. हॉर्नबिल्सना घरटी करण्यासाठी आवश्यक असणारी मोठमोठी झाडे इमारती लाकडासाठी छाटली जातात. हळू वाढणारी म्हणून मूळ परिसरातील झाडांकडे दुर्लक्ष करून वेगवान वाढ असणाऱ्या विदेशी झाडांची लागवड केली जाते. याचा परिणाम म्हणून हॉर्नबिल्स साठी महत्वपूर्ण अशा फळझाडांची, फळांची उपलब्धता कमी होत आहे. दिमाखदार चोचींचा वापर अनेक ठिकाणी सुशोभीकरणासाठी केला जातो आणि त्यांची शिकार केली जाते. दिवसेंदिवस हॉर्नबिल्सची घटणारी संख्या हि चिंताजनक बाब आहे. वनखात्याच्या सहयोगाने तसेच स्थनिक लोकांच्या सहभागाने हॉर्नबिल्स आणि त्यांचा अधिवास सुरक्षित आणि जतन करणे अत्यंत गरजेचे आहे.
The Great Hornbill is the largest bird in our woodlands. Its majestic appearance and unique behaviour have intrigued ecologists to find out more about the lifestyle of this bird. The present article sheds light on the ecology and conservation of hornbills.
This article was first published in Pakshi Mitra
Photo credits: Rujan Sarkar (Cover)