भाषांतर: परीक्षित सूर्यवंशी
जगभरातील अनेक मानवी समाजांत मानव-वन्यजीव सह-अस्तित्त्वाला मोठा इतिहास आहे. भूप्रदेश आणि नैसर्गिक संसाधनांच्या एकत्रित वापरातून त्यांच्यात एक गुंतागुंतीचे, मजबूत आणि दीर्घकालीन असे नाते निर्माण झाले आहे. महाराष्ट्राच्या वारली या आदीवासी समुदायात हे नाते वाघोबा या व्याघ्र देवाच्या रूपाने प्रकटले आहे. वाघ आणि बिबट्या अशा दोघांचे रूप असलेल्या वाघोबाची पूजा ही मुख्यत्वे या दोन मोठ्या मार्जारवर्गीय प्राण्यांपासून संरक्षणासाठी केली जाते. “शेअरिंग स्पॅसेस अँड एंटेंगलमेंट्स विद बिग कॅट्स : द वारली अँड देअर वाघोबा इन महाराष्ट्रा, इंडिया” (मोठ्या मार्जारवर्गीय प्राण्यांसोबत सहअस्तित्त्व आणि त्यातील गुंतागुंत: भारतातल्या महाराष्ट्रातील वारली आणि त्यांचा वाघोबा - https://bit.ly/3wM3FWm) असे शीर्षक असलेल्या आपल्या अभ्यासात संशोधकांनी वाघोबाला समर्पित असलेल्या १५० देवस्थानांची नोंद केली आहे. रम्या नायर, धी, ओंकार पाटील, निकीत सुर्वे, अनिश अंधेरीया, जॉन डी. सी. लिनेल आणि विद्या अत्रेय यांनी लिहलेला हा स्टडी पेपर नुकताच फ्रंटियर्स ऑफ कन्झर्वेशन सायन्स - ह्युमन-वाईल्डलाईफ डायनामिक्स या नियतकालिकात ‘अंडरस्टॅण्डिंग कॉएक्झीस्टन्स विद वाईल्डलाईफ’ (वन्यजीवांबरोबरचे सहअस्तित्त्व समजून घेऊया) या नावाने प्रकाशित झाला आहे.
हा अभ्यास डब्ल्यूसीएस-इंडिया व नॉर्वेच्या NINA आणि इनलँड नॉर्वे युनिव्हर्सिटी ऑफ अप्लाईड सायन्सेसच्या संशोधकांनी एकत्रितपणे केला असून वाईल्डलाईफ कन्झर्वेशन ट्रस्टने त्यासाठी आर्थिक पाठबळ दिले आहे. या अभ्यासासाठीचे क्षेत्र-कार्य (फिल्डवर्क) हे महाराष्ट्रातील मुंबईची उपनगरे, पालघर आणि ठाणे जिल्ह्यात २०१८ ते २०१९ दरम्यान करण्यात आले. यावेळी माहिती संकलनासाठी मानववंशशास्त्रीय पद्धतीचा वापर केला गेला ज्या अंतर्गत संशोधकांनी वाघोबाच्या देवस्थानांच्या नोंदी घेतानाच तेथील लोकांच्या अर्ध-संरचित मुलाखती (सेमी-स्ट्रक्चर्ड इंटरव्ह्यू) घेतल्या आणि त्यांच्या वर्तनाचे निरीक्षण केले (मुख्यत्वे पूजा सोहळ्यात सहभागी झालेल्या लोकांचे). या मुलाखतींत वारलींच्या जीवनातील वाघोबाची भूमिका, वाघोबाच्या पूजेचा इतिहास, त्याशी संबंधित सण-समारंभ, विधी, परंपरा आणि मानव-बिबट्या यांच्यातील परस्परसंबंधांशी वाघोबाचे नाते समजून घेण्याच्या उद्देशाने प्रश्न विचारण्यात आले.
दगडावरील वाघोबा (छायाचित्र: रम्या नायर)
या अभ्यासात वारलींचा परस्पर सहकार्यावर आधारित संबंधांवर विश्वास असल्याचे आढळून आले. त्यांच्या मते, जर त्यांनी वाघोबाची पूजा केली आणि त्यासाठी आवश्यक विधी केले (मुख्यत्वे वाघबारसचा वार्षिक उत्सव) तर वाघोबा वाघ-बिबट्यांच्या क्षेत्रात राहताना त्यांचे संरक्षण करेल. संशोधकांच्या मते असे संबंध त्या एकाच भूप्रदेशात राहणाऱ्या मानव आणि बिबट्यांच्या सहअस्तित्त्वास पूरक ठरतात. त्या भूप्रदेशातील वेगवेगळ्या संस्था आणि घटक वाघोबा या संकल्पनेला आणि त्याद्वारे मानव-बिबट्या संबंधांना कशाप्रकारे आकार देतात हे देखील हा अभ्यास विषद करतो.
वाघोबाचा पूजा सोहळा, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, मुंबई (छायाचित्र: रम्या नायर)
या अभ्यासाचे संशोधक असेही म्हणतात की, “ही बाब आजच्या वन्यजीव संवर्धानासाठीही महत्त्वाची आहे कारण अशा (वाघोबासारख्या) परंपरागत संस्था या स्थानिक श्रद्धा प्रणालीत रुजलेल्या सहनशीलता-निर्मिती यंत्रणांप्रमाणे काम करतात. वारली समाजाबाहेरील महत्त्वाच्या संबंधित घटकांना (जसे वन विभाग, संवर्धन जीवशास्त्रज्ञ आणि इतर वारली समाजाबाहेरील लोक ज्यांचा बिबट्याशी संबंध येतो) या बाबत माहिती असणे आणि त्यांनी या सांस्कृतिक गोष्टींविषयी संवेदनशील असणे आवश्यक आहे कारण वारली समजाचा संबंध हा फक्त जैविक प्राण्यांशीच येत नाही.”
या अभ्यासाचे मुख्य उद्दिष्ट हे मानव-वन्यजीव यांच्यातील परस्परसंबंधांकडे बघण्याच्या दृष्टीकोन आणि त्यांना समजून घेण्याच्या पद्धतींत विविधता आणणे आहे. यासाठी सहअस्तित्त्वाला हातभार लावणाऱ्या स्थानिक संस्थांत संघर्ष नसतो असे नाही, तर संघर्ष असूनही संघर्षातून मार्ग काढण्यासाठीची भूमिका त्या कशाप्रकारे बजावतात, हे अभ्यासातून विषद करण्यात आले आहे.
मानव-वन्यजीव संबंधांतून निर्माण होणारे प्रश्न सोडवू पाहणाऱ्या, अशा स्थानिक व्यवस्था कदाचित इतरही अनेक संस्कृती आणि भूप्रदेशांत असतील. आज संवर्धन प्रक्रियेत स्थानिकांचा समावेश आणि सहभागावर विशेष भर दिला जात जी एक चांगली बाब आहे, परंतु असे करतानाच आपण एखाद्या प्रदेशात संवर्धनासाठी जाताना आपल्या आधीही त्यांचा स्वतःचा काहीएक इतिहास असू शकतो याचा विसर आपणास पडता कामा नये.